क्रीडा कौशल्य ही आयुष्याची भक्कम पायाभरणी : एम. के. देशमुख

Foto
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पावसाळी विभागीय क्रीडा स्पर्धेत भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाचा विद्यार्थी सोफियान दगडू शहा याने कुस्तीमध्ये आपल्या दमदार खेळाची झलक दाखवत प्रतिस्पर्धी असलम पठाण कन्नडकरचा पराभव केला. जिल्हा स्तरावर विजेता ठरलेला सोफियान आता विभागीय स्तरावर चमक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या पराक्रमामुळे शाळा, गाव आणि पालकांचा अभिमान उंचावला आहे.

सोफियान शहाचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी बोलताना माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी क्रीडेचे महत्त्व अधोरेखित केले. देशमुख म्हणाले, क्रीडा ही केवळ शारीरिक ताकद दाखविण्याची जागा नाही, तर ती आयुष्याची भक्कम पायाभरणी करते. अंगभूत क्रीडा कौशल्याच्या जोरावर विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करतात. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विजय त्यांना मानाचे प्रमाणपत्र देतो. हे प्रमाणपत्र फक्त कागदावरची नोंद नसते, तर आयुष्यभर आत्मविश्वासाने जगण्याची उर्जा असते. प्राथमिक आणि माध्यमिक टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अशी तयारी केली, तर ती पालकांच्या अभिमानातही भर घालते.

देशमुख यांनी पुढे सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाइतकेच क्रीडा देखील महत्त्वाची आहे. खेळ विद्यार्थ्यांना शिस्त, मेहनत, संघभावना, संयम आणि चिकाटी शिकवतो. हे गुण त्यांना भविष्यातील सर्वच आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करतात. 

या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक  तुपे, अशोक गरूड, प्रा. शाम सरकटे, आबासाहेब जगताप,  व्हि. कोमटवार, मनोज पाटील, राकेश गांगुर्डे, दाभाडे, अविनाश सुरडकर, डीगंबर भोसले, अनिल दुतोंडे, नरेश बलकार, संदीप देशमुख, राधिका शेळके, शुभांगी सोनवणे यांच्यासह पालक, अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरव सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांनी सोफियानला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, विभागीय तसेच राज्य स्तरावर तो आणखी मोठे यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.